Blog

आमची आनंददायी शाळा

( दिशा स्कुल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निंग, वरोरा च्या उप-मुख्याध्यापिका नंदा वाटेकर व समन्वयक शुभम पिसे यांनी शाळेच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेला लेख )

शाळा आणि शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य असा महत्वपूर्ण घटक आहेत. आणि प्रत्येक पालकासाठी अतिशय जबाबदारीपूर्ण तितकाच काळजी वाटणारा घटक आहे,कारण पालकांनी घेतलेल्या लहानशा निर्णयावर फक्त एका व्यक्तीचे आयुष्यच नव्हे तर समाजाचा अविभाज्य घटक असणार्‍या भविष्यातील नागरिकचा सुद्धा निर्णय होत असतो. असे म्हटल्या जाते,की प्रत्येक व्यक्ति त्याला मिळालेल्या शिकवणीच्या,अनुभवाच्या आधारे एक व्यक्तिमत्व म्हणून तयार होतो. मिळविलेल्या माहितीतून विचार बनतात पण बनलेले विचार किती चूक – किती बरोबर,त्याविषयीची संवेदनशीलता व जाण फक्त शिक्षणामुळे प्राप्त होऊ शकते आणि म्हणूनच शिक्षण घेणे व माहिती घेणे या दोहोंमध्ये फरक आहे,असे म्हटले जाते.

शिक्षण म्हटले की लगेच शाळा-कॉलेज ची  आठवण येते,पण खरंतर प्रत्येकाची पहिली शाळा त्याचे घर असते.आणि त्या घरातील आई-वडील किंवा इतर सदस्य हे त्याचे शिक्षक असतात.जसे,विशिष्ट वयात विद्यार्थ्याचा प्रवेश शाळेत होतो,तिथचे शिक्षण पूर्ण करून विद्यालय व मग महाविद्यालय वैगेरे. आणि या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी आधीच्या वर्गात काय शिकला यावर त्याच्या पुढील वर्गाच भवितव्य अवलंबून असतं,तसच शाळेत प्रवेश घेण्याआधी त्याची जीवनातील पहिली शाळा असलेल्या घरच्या शाळेत तो काय शिकला,हे सुद्धा तितकेच महत्वपूर्ण असते. ज्याप्रमाणे, शाळेच्या वातावरणातील गोष्टी विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतात आणि ते वातावरण टिकवून ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे,त्याचप्रमाणे त्याच्या घरचे वातावरण देखील त्याच्यावर प्रभाव पाडत असतात. आणि ते वातावरण त्याच्या व्यक्तिमत्वास पोषक ठरेल याची महत्वपूर्ण जबाबदारी पालकांच्या खांद्यावर असते.

बालक अवस्थेतील मन हे जिज्ञासेनी भरून असते. त्या वयातील मूल हे स्वतः एका संशोधकाच्या भूमिकेत असते.म्हणजे समजा, पाण्याला रंग नाही,ही गोष्ट आपल्यासाठी लहान आहे. पण त्याच गोष्टीबद्दल ते मूल जेव्हा पहिल्यांदा विचार करते,तेव्हा ती गोष्ट त्याच्यासाठी कमालीची आनंददायी ठरते. आणि इथे मिळालेले जरासे प्रोत्साहन त्याला समोरील चिकित्सक विचारसरणी साठी प्रवृत्त करणारे ठरू शकते.आपल्यासाठी अतिशय लहान असणारी गोष्ट देखील,ते मूल जेव्हा पहिल्यांदा अनुभवते तेव्हा त्याच्यासाठी रोमांचक व आनंददायी अनुभवानी भरून असते. आणि तिथे गरज असते त्या जिज्ञासेला वाव देण्याची. तिथे मिळालेले जरासे प्रोत्साहन हे त्या मुलाचे आयुष्य बदलवून टाकणारे होऊ शकते.

यासोबतच विद्यार्थी शाळेत पाऊल टाकतो आणि अचानक अभ्यासक्रम संपविणारा वर्ग,पाठांतर वर अवलंबून असणारा निकाल,निकालात शोधल्या जाणारे भविष्य यातच कुठेतरी त्याचे शिक्षण हरवून जाते. आणि खर्‍या शिक्षणाची सुरुवात होते,ती जिज्ञासेला मिळणार्‍या प्रत्तेक उत्तरातून,ऐकण्या-वाचण्या इतकच त्याच्या संबंधित गोष्टी समजण्या-अंनुभवण्यातून. 

खरंतर शिक्षण ही सध्यासाठी तितकी कठीण गोष्ट नसेल.पण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजांचा ताळमेळ साधत,त्याच्यातील क्षमतेला ओळखून आकार देणारी शिक्षणपद्धती ही मात्र गरज होऊन बसली आहे. आपण जी शिक्षणपद्धती पाहतो त्याच्यात विद्यार्थ्याने पाटी-बुकात काढलेल्या अक्षराला महत्व दिले जाते,परंतु तीच गोष्ट एखादी विद्यार्थी पाटी-बुकावर शिकत नसेल परंतु रेतीच्या ढीगात,मातीच्या चिखलात किंवा इतर कुठल्याही ठिकाणी काढण्यास सक्षम असेल तर ते मात्र तितके महत्वाचे वाटत नाही किंवा तो विद्यार्थी तसा पण अक्षर शिकू शकतो हे समजण्यास शिक्षणप्रणाली असमर्थ ठरते.आपण प्रत्तेक व्यक्ति वेगळा हे मानतो,प्रत्येकाचे विचार वेगळे हेही मानतो. पण शिकतेवेळी प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने शिकू शकतो,हीच गोष्ट आपण विसरतो. बरेच वेळा तर विद्यार्थी शिकण्यात कमजोर आहे,ही गोष्ट त्या विद्यार्थ्याला सांगून सांगून मानण्यास भाग पाडत असतो. प्रत्येकच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. खरंतर ‘एखादी गोष्ट शिकायची कशी हे शिकणे’ म्हणजेच प्रभावी शिक्षण घेणे असे होते.

चार मित्र एकत्र बसले की खूप सार्‍या गप्पा रंगतात.बोलता-बोलता एकमेकांना सावरतात,कोणी चुकला तर सुधारतात आणि हीच पद्धती शिक्षणाच्या बाबतीत देखील लागू पडते. म्हणजे समजा शिकवणी झाल्यानंतर शिकविण्यात आलेल्या भागावर चार मित्रांनी चर्चा केल्या तर इथेदेखील ते चुकणार्‍या मित्राला सुधारू शकतात. वर्गशीस्तीच्या नावावर कायम विद्यार्थ्यांना शांत बसविण्यापेक्षा योग्य वेळाची संबंधित विषयावर सूट दिली तरी बराच फरक पडू शकतो.

विद्यार्थ्याच्या घडनीत पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय,हा देखील महत्वपूर्ण ठरतो. विद्यार्थ्याचा वेगळेपणा शिक्षकांच्या सहज लक्षात येण्यासाठी पाहिजे तितका वेळ आपल्या शिक्षणप्रणालीत मिळत नाही आणि हीच तूट भरून काढण्याचे काम या समन्वयाच्या माध्यमातून होते.सोबतच विद्यार्थ्याशी निगडीत अनेक लहान-मोठ्या समस्या,प्रश्न यासारख्या अनेक विषयावर समन्वयातून फायदा होतो ज्यातून आपोआपच विद्यार्थ्याच्या जडणघडणीचा मार्ग सुकर होऊ लागतो.

व्यक्तिमत्वाच्या घडणीतील सर्वात मोठा भाग म्हणजे शिस्त हा समज आहे,आणि शिस्त म्हणजे काय तर दिलेल्या धाकाच्या जोरावर आपल्याला पाहिजे ती गोष्ट करण्यास भाग पाडणे,असाही गैरसमज आपण बाळगू लागतो.आता अशी शिस्त ही खरंच पुर्णपणे बदल घडवू शकते का ? तर नक्कीच नाही. याउलट पाहिजे असलेली प्रगती देखील साधता येत नाही.आम्ही दिशा स्कूल ऑफ इनोवेटीव लर्निंग या वरोरा स्थित शाळेत असाच प्रयोग करतो. तिथे विद्यार्थ्याला शिस्तीच्या नावावर धाक देण्याऐवजी विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रयोगातून,माध्यमातून वैचारिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या बदलातून विद्यार्थ्याला स्वयंशिस्तिकडे प्रवृत्त करतो,यातून व्यक्तिमत्व घडणात पाहिजे असणारा आणि आयुष्यभर असेल असा,वैचारिक बदल तर होतोच आणि स्वयंशिस्त सुद्धा लागते पण यासोबतच विद्यार्थ्याला कुठलाही धाक नसल्याने तो शिक्षणसोबत मनमोकळिक बोलतो,ज्यातून त्याच्या विषयाशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण होते.

विद्यार्थ्याला वेळोवेळी मिळणारी सहभागाची संधी,प्रत्तेकच्या वैशिष्ठ्याला,त्याच्या आवडीला मिळणारा आकार,प्रोत्साहन या गोष्टीदेखील शिक्षणप्रणालीत मोठे काम करतात.वेगवेगळे प्रयोग,लाईव व अनुभवता येणारी प्रात्यक्षिके, शिक्षणाचा जीवनाशी येणार्‍या संबंधाची करून दिलेली जाणीव, वर्कशिट, आनंददायी पण शिक्षणयुक्त खेळ हेदेखील शिक्षणप्रणाली घडविण्यास मदतगार ठरते. विद्यार्थ्यासाठी लावले जाणारे शिकवणी वर्ग कधीकधी हेसुद्धा त्याच्या शिक्षणासाठी मारक ठरतात. शाळेबाहेर च्या जगातून देखील विद्यार्थी खूप काही शिकत असतो,त्याचा त्याच्या कुटुंबासोबतचा वेळ हा विद्यार्थ्याला मानासिकदृष्ट्या सक्षम करण्यास मदतगार ठरतो. याचसाठी शाळेव्यतिरिक्त विद्यार्थी त्याचा वेळ हा आपल्या कुटुंबासोबत,मित्रांसोबत आणि खेळण्यात घालवत असेल,तर त्यात चुकीच असा काहीच नाही.मात्र त्याचा नियमित व आवश्यक अभ्यास पूर्ण करवून घेण्यास आग्रही असले पाहिजे. घरातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा त्याच्या सभोवतालून काहीतरी शिकतो,त्यामुळेच विद्यार्थ्यासाठी पोषक असे वातावरण तयार करणे,हीदेखील समाजातील घटकांची जबाबदारी बनते.

शिक्षणव्यवस्थेत बदलाची आवश्यकता आहे. मार्कांच्या स्पर्धेपेक्षा शिकण्याचा, समजण्याचा, एकोप्याचा व माणूस बनण्याचा प्रवास संवेदनशील प्रवास म्हणजे शाळा.